दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीतून बेशुध्द पडलेल्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून

नाशिक : दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीत बेशुध्द पडलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मंगळवारी (दि.5 ) रात्री आनंदवली परिरात ही घटना घडली आहे.

महेश विष्णू लायरे (29,रा. दत्तनगर, चुंचाळे), असे मृत युवकाचे नाव आहे. तर, रुपेश छोटुलाल यादव (36, रा.शिवशक्ती चौक, सिडको ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश मृत महेश यानी मद्य खरेदी करून पार्टी करण्यासाठी आनंदवली शिवारातील गंगापूररोडलगत वापरात नसलेल्या निर्जन इमारतीत दोघेही जाऊन बसले.मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी एकमेकांची कुरापत काढून भांडण केले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले यात महेश हा बेशुध्द पडला. तो उठल्यावर आपल्याला संपवेल या भितीतून रुपेश यादव याने बेशद्ध अवस्थेतील महेशच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केला.

यानंतर रुपेशने इमारतीतून बाहेर पडत तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाला स्वत:केलेल्या गुन्ह्याबाबत सांगितले. त्या नागरिकाने त्यास धरुन ठेवत तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित नशेत बडबडणाऱ्या संशयित रुपेश यास अटक केली. तसेच, इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. संशयित यादम खूप मद्य पिला असल्याने खून झालेल्या मित्राचे नाव तो पोलीसांना सांगत नव्हता यामुळे रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू होती. अखेरीस त्याचेही नाव निष्पन्न झाले. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.