दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी गजाआड

नगर  : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी बुधवारी (दि.6) रोजी पहाटे नगर शहरातील कायनेटीक चौकात पाठलाग करून पकडली. त्यांच्याकडून कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मिरची पुड असे साहित्य जप्त करण्यात आले.

समीर ख्याजा शेख (वय- 23 रा. झरेकर गल्ली, नालेगाव), विशाल राजेंद्र भंडारी (वय- 19 रा. चिपाडे मळा, सारसनगर), परवेज मेहमूद सय्यद (वय- 19 रा. भोसले आखाडा), प्रतिक अर्जुन गर्जे (वय- 22 रा. भगवान बाबा चौक), अमोल संजय चांदणे (वय- 19 रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर खाल्या ऊर्फ खलिद मन्सूर शेख (रा. काळे गल्ली, भोसले आखाडा) व एक अनोळखी इसम पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई तानाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यातील कर्मचारी गस्त घालत असताना एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. तीन दुचाकीवरून आलेल्या सात संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यातील पाच जण पकडले.

पकडलेल्या आरोपींकडून दरोड्याच्या साहित्यासह तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.