पॅरोलवर सुटलेल्या अट्टल गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोणी काळभोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.७) दुपारी उघडकीस आला आहे.
सचिन सुभाष कदम (वय वय. ४५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे या सराईत गुन्हेगार याचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कदम याच्यावर लोणी स्टेशन येथील एका गुन्हेगारांचा खून केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला असून, आरोपींला अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच होती.यावेळी आरोपीने घरात प्रवेश करत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली.मात्र, मुलीने सचिन याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढला. आरोपीने घऱातून पळून जाताना पीडित मुलीच्या घऱाबाहेरील दुचाकीचा आरसा फोडला.
दरम्यान आरोपी निघून गेल्याची खात्री होताच पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनीही तातडीने पोलीस ठाणे गाठत सचिन कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!