सामुहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे उपमुख्यमंत्री अजित पवार: कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा घेतला आढावा

पुणे  : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामुहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे ऑनलाईन तर सभागृहात खा. गिरीष बापट, आ. माधुरीताई मिसाळ, आ. चेतन तुपे, आ.सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम,पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी कोरोना अजूनही गेलेला नाही त्यामुळे दक्षता घेत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

खा. गिरीश बापट यांनी रुग्णवाहिकेची उपलब्धता, ससून रुग्णालयाचे सुरू असलेले काम तसेच कोविड सेंटर आदी विषय मांडले. कोरोना व्यवस्थापनाबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
डॉ.सुभाष साळुंके यांनी कोरोना स्थिती, आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत शासनाच्या सूचना व त्याबाबची कार्यवाही, कोविड लशीकरण पुर्वतयारी, रंगित तालीम, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती तसेच इतर आवश्यक उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची दक्षता घेतली जात असल्याचे सांगितले.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.