पुण्यातील गुटख्याचे कनेक्शन थेट गुजरातमध्ये, ‘काशी व्हेंचर’ कंपनीवर पुणे पोलीसांचा छापा; तब्बल 15 कोटींचा गुटखा ‘जप्त’

पुणे :गुटख्यावर बंदी असूनही त्याची विक्री होत असल्याने पुणे पोलीसांनी गुटखा विरोधी मोहीम सुरुवात करत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करून आतापर्यंत 28 ठिकाणी छापे टाकून मोठया प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपींचे चौकशी दरम्यान गुजरात राज्यात वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्वासा “गोवा’ या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार पुणे पोलीसांचे युनिट चारचे पथकाने सिल्वासा येथे काशी व्हेंचर्स या कंपनीवर छापा टाकून 15 कोटींचा गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखाकिंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

पुणे पोलिसांनी 17 डिसेंबर रोजी चंदननगर परिसरात छापे मारी करत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, नीरज मुकेश सिंगल, प्रवीण मुकुंद वाहुळ यांच्यावर छापमारी करत साडे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक करत होते.तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे पोलीसांनी हवालाद्वारे व्यवहार करुन देणाऱ्या पाच ठिकाणांवर छापे टाकून सुमारे चार कोटी रुपये इतकी रक्कम जप्त केली. दोन जानेवारी रोजी पोलीसांनी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकुन 25 लाख रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केली.

याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन व वितरण हे वापी (गुजरात) व सिल्वहासा (दादर नगरहवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने अटक आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

सिल्व्हासा स्थित गोवा या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणा-या काशी व्हेंचर्स या कंपनीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने कंपनीवर छापा टाकून कोट्यवधींचा गोवा गुटखा व तो बनविण्यासाठी उपयोगात येणारा कच्चा माल त्यात सुंगधी द्रव्य, तंबाखु, सुपारी, चुना, कात पावडर, कॅल्शियम काबोर्नेट पावडर, मेन्थॉल क्रिस्टल, इलायची, ग्लिसरीन इ.पदार्थ व यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वासा याठिकाणी कारवाई केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.