गुंगीचे औषध देऊन गर्भवती महिलेचे अपहरण अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन केले अत्याचार  

कोल्हापूर :  गर्भवती विवाहित महिलेचे गुंगीचे औषध देऊन आसाममधून अपहरण करण्यात आले .त्यानंतर तिच्या मुलीला ठार करण्याची धमकी देत तिच्याशी लग्न केले आणि तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आसाम, राजस्थानसह कोल्हापुरात घडला. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

रामकरण बन्सीधर योगी (वय 35), दिलीप रामेश्‍वर योगी (30, दोघे रा. राजस्थान) व अन्य दोन परप्रांतीय महिलां यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आसाममधील असून, तिला एक मुलगी आहे. संशयित रामकरण, दिलीप योगी व अन्य दोन महिलांनी सप्टेंबर 2020 मध्ये तिला एका ओळखीच्या ठिकाणी बोलवून घेतले. तेथे तिला पिण्यास काहीतरी दिले. तशी पीडिता बेशुद्ध पडली. त्यानंतर संशयितांनी तिला आसाममध्येच एका ठिकाणी नेले. तेथे तिच्या मुलीला ठार करण्याची धमकी देत संशयित रामकरण याच्याशी तिला लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला राजस्थानात घेऊन गेले. तेथे काही दिवस राहिले. त्यानंतर महिन्यापूर्वी तिला ते कोल्हापुरात घेऊन आले.

कोल्हापुरात संशयितांनी पीडितेला एका भाडेतत्त्वावरील खोलीत डांबून ठेवले. दरम्यान, पीडिता गर्भवती असल्याचे माहीत असतानाही संशयित रामकरण व दिलीप योगीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिला त्या दोघांनी “आम्ही तुला विकत घेतले आहे’ असे सांगत मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर त्या दोघांसह अन्य तिघांनी अत्याचार केले. हा प्रकार संबंधित महिलेने शेजारील एका महिलेला सांगितला. त्याच माध्यमातून तिने करवीर पोलिस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री एका संशयितास ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.