चिंताजनक! मुंबईत सापडला अँटिबॉडीजवर भारी पडणारा करोनाचा नवा विषाणू.

 

मुंबई : करोनाच्या वैश्विक महामारीचा कहर जगभरात गेल्या एक वर्षापासून सुरु आहे. त्यातच आता ब्रिटनमधून आलेल्या नव्या करोनाच्या विषाणूने काळजीत भर टाकली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या १०० वर पोहोचणार आहे. दरम्यान, मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नाही.

मुंबई उपनगरातील खारघरमध्ये टाटा मेमोरियल सेंटरमध्ये करोनाचा नवा म्युटेंट आढळून आला आहे. या म्युटेशनला E484K च्या नावानंही ओळखलं जात. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हा दक्षिण अफ्रिकेत मिळालेल्या करोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, हे दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या तीन म्यूटेशन (K417N, E484K आणि N501Y) मधून आला आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमने ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंसिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी तीन नमुन्यांमध्ये E484K म्यूटेंट मिळाला आहे. कोविडचा हा म्यूटेंट मिळणं यासाठी चिंताजनक आहे कारण जुन्या विषाणूमुळे शरिरात प्रतिरोधक क्षमतेमुळं तयार झालेली तीन अँटिबॉडी यावर प्रभावहीन आहे.

ब्रिटनच्या स्ट्रेनपेक्षा अधिक घातक

माध्यमातील वृत्तांनुसार, दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या म्युटेंटला ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक धोकादायक सांगण्यात येत आहे. लस अँटिबॉडी बनवण्याच्या सिद्धांतावर काम करते. दरम्यान, संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, करोनाच्या या म्युटेंटचा जगभरात सुरु झालेल्या लसीकरणावर काय परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तीन जण झाले होते संक्रमित

ज्या तीन रुग्णांमध्ये करोनाचा हा म्युटेंट आढळून आला होता. ते गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये करोना संक्रमित झाले होते. तिघांचं वय ३०, ३२ आणि ४३ वर्षे आहे. यांपैकी दोन रुग्ण रायगड आणि एक ठाण्यातील आहे. यांपैकी दोघांमध्ये करोनाची साधारण लक्षणं दिसून आली होती. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्या रुग्णालाही ऑक्सिजन सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरची गरज भासली नव्हती.

तज्ज्ञ म्हणतात इतका धोकादायक नाही

तज्ज्ञ मंडळीचं म्हणणं आहे की, हा नवा म्यूटेंट जास्त धोकादायक नाही. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे डॉक्टर गिरिधर बाबा यांचं म्हणणं आहे की, हा म्यूटेंट सप्टेंबरमध्येच भारतात दाखल झाला आहे. जर हा इतकाच धोकादायक असता तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.