धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी अखेर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावर भाष्य केलं आहे. “पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज बैठक झाली. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणावर माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार 

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराच आरोप आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला.” “धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितली माहिती या नेत्यांपुढे मांडणार आहे. त्यांची मतं जाणून घेऊन पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ,” असं शरद पवार म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तिने सोशल मीडियावर पोलीस बलात्काराची तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं जाहीर केलं आणि या प्रकरणाची दखल माध्यमांमधून घेण्यात आली. बलात्कारासारखा गंभीर आरोप असल्याने राजकीय खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी हे आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याविषयी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचा जावई अटकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानीला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही एनसीबीने जप्त केला. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आलं आहे. यासंदर्भात एनसीबीने समीर खान याची बुधवारी (13 जानेवारी) जवळपास दहा तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.