”कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री” – धनंजय मुंडे प्रकरणांवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
मुंबई :राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. मात्र यानंतर महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री’, असं म्हणत सूचक विधान केलं आहे.अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. असं देशमुख म्हणाले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असताना ते बोलत होते.
शिवाय ते पुढे असंही म्हणाले कि, “कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.”
मुंडेंवरील आरोपांना नवी कलाटणी
मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!