पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.

मुंबई : राज्यातील रेल्वे मार्गाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. राज्याच्या विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी आराखडा तयार केला आहे. त्यातील पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अपर प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत. हा रेल्वे मार्ग पुणे आणि नाशिक येथील औद्योगिक क्षेत्र आणि तिर्थक्षेत्रांना जोडणारा अजून भाविकांना शिर्डीला जाणेही सोयीचे होईल. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास या भागातील आर्थिक विकास गतिमान होऊन महसूल वाढीबरोबरच या भागातील कृषी, पर्यटन, उद्योग वाढीस, कृषी-औद्योगिक उत्पादनाच्या वाहतूक व निर्यातीस मोठी मदत होईल, रोजगार निर्मितीस चालना मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

एमआरआयडीसी मार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले. यामध्ये मुंबई-पुणे (हायस्पीड रेल्वे प्रकल्प १ तास प्रवास), रत्नागिरी-पुणे, औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण- कराड (नवीन लाइन), वैभववाडी-कोल्हापूर (नवीन लाइन) या प्रकल्पाचा समावेश होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.