औरंगपुरा येथे किरकोळ कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून
औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील पिया मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गुरुवारी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेत होती.
समीर खान सिकंदर खान (वय २७, रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी) असे मृताचे नाव असून त्याच्यावर अपहरण, विनयभंगसह अन्य गुन्हे दाखल होते.असेफिया कॉलनी येथील समीरचा गांजा विकण्याचा पिढीजात धंदा आहे.
पोलीसांनी चिराग राजपाल बिडला (वय २२, रा. गांधीनगर) याच्यासह दोन विधी संघर्षग्रस्त मुलांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले. याप्रकरणी मोहंमद आदिल मोहंमद आरेफ (वय २८, रा. चिश्तिया कॉलनी, एन-६, सिडको) यानी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व समीर खान सिकंदर खान हे दुचाकीने बिअर घेण्यासाठी औरंगपुऱ्या येथील पिया मार्केटमध्ये गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आले होते. मार्केटमधील बिअर शॉपीसमोर दुचाकी उभी केली. त्यानंतर दोघेही पहिल्या मजल्यावरील बिअर शॉपीकडे गेले. मात्र, ती बंद असल्याने दोघेही खाली येऊन उभे राहिले. त्याचवेळी चिराग व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार आपसात बोलत उभे होते. तेवढ्यात एकाने समीरला शिवीगाळ करून’ इकडे का आला,’ असे विचारले. त्यावर मोहंमदने ‘तू दारू पिलेला आहेस. इथून निघून जा,’ असे सांगितले. त्यावर त्याने मोहंमदच्या कानशिलात लगावली. म्हणून समीर खानने मध्यस्थीचा प्रयत्न केला. तेवढ्यातच एकाने समीरच्या गुप्तांगाजवळ चाकुने वार केल्याने समीर जमिनीवर कोसळला. घटनेनंतर मारेकरी पसार झाले, तर मोहंमदने तात्काळ शोएब नामक मित्राला फोन करून बोलावून घेतले. पुढे शोएब व मोहंमदने समीरला घाटीत नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिघांनी तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पिया मार्केटमधील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची तपासणी केली. तोपर्यंत पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त नीकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्यासह गुन्हे शाखा, बेगमपुरा, क्रांतीचौक पोलिस देखील दाखल झाले. ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केल्यानंतर पहाटे पोलिसांनी मारेकऱ्यांना घरातून उचलले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!