कोरोना लसीकरण – आधी रक्षणकर्त्यांना संरक्षण!; टप्प्या-टप्प्याने राज्यातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना :- कोरोनावरील लस सुरक्षित असून राज्यामध्ये लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेऊन समाजातील प्रत्येकाने ही लस टोचून घेण्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करत टप्प्या-टप्प्याने ही लस राज्यातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

 

जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात श्री. टोपे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ.पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप, रुग्णवाहिका चालक अमोल सुधाकर काळे यांना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकार रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेली असून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येकाने ही लस घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. टोपे म्हणाले, कोरोनाकाळात सातत्याने अतिदक्षता विभागामध्ये चोवीस तास कार्यरत राहून रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे करण्याबरोबरच रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉ.पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप यांच्यासह अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक यांना लस टोचण्याचा मान सर्वप्रथम देण्यात आला.

लस घेतल्यानंतर या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसतानाच त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना दिसून आली.  लस दिल्यानंतर कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

 

कोरोनावरील लस एकदम सुरक्षित

लसीच्या पहिल्या मानकरी डॉ. सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

 

गेल्या मार्च महिन्यापासून आम्ही कोविड-19 महामहामारीचा मुकाबला करत सातत्याने रुग्णांवर उपचार करत आहोत. या काळामध्ये अनेक दु:खद घटनाही अत्यंत जवळून पाहिल्या आहेत.  कोरोनावरील लस घेण्याचा जिल्ह्यातून सर्वप्रथम मान मला मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद होत असून ही लस एकदम सुरक्षित आहे. या लसीमुळे कोरोनापासून सुरक्षितता मिळणार असल्याने प्रत्येकाने ही लस टोचून घेण्याचे आवाहनही डॉ.सराफ यांनी यावेळी केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.