भारतीयांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर  : जागतिक स्तरावर अन्य देश कोरोना नियंत्रणासाठी हतबल झाले असताना भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महालसीकरणाला सुरुवात केली आहे. हे सर्व भारतीय जनतेच्या मनामनात असणाऱ्या दयाभाव व सेवावृत्तीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 

नागपूर येथील राजभवन येथे आयोजित ‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअॅबिलिटी’ संस्थेमार्फत आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे, ‘कॉमनवेल्थ असोसिएशनचे’ अध्यक्ष डॉ.उदय बोधनकर उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीमध्ये सेवाभावाला सर्वाधिक महत्त्व आहे. वेगवेगळ्या विचार प्रवाहात असणाऱ्या सर्व समुदायाकडे श्रद्धेने काम करण्याचा एक स्थायीभाव ईश्वरी देणगी प्रमाणे लाभला आहे. त्यामुळेच १३० कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये आम्ही उत्तम काम करू शकलो. कोरोना साथीच्या आजारांमध्ये अनेकांनी पगार नसतानादेखील काम केले. अनेक संकटे उभी ठाकली असताना देखील प्रत्येक जण सेवेसाठी पुढे आले. अशा पद्धतीने दयाभाव दाखवत दुसऱ्याला मदत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर भारत या संकटावर प्रभावीपणे मात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आजच्या सत्कारामध्ये बहुतांश डॉक्टरांनी आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अधिक श्रम घेऊन काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. यापेक्षा अधिक मोठ्या सन्मानाला आपण सर्वजण पात्र आहात. खरे म्हणजे जी लोक तज्ञ आहेत, असे तज्ञ जेव्हा संकटाच्या काळात पुढे येऊन लढतात. त्यावेळेस समाजाच्या सामाजिक पुरुषार्थाला जाग येते. समविचारी सोबत येतात. आणि जगाचे शुभ चिंतन सुरु होते. कारण या कामाला ईश्वराची साथ आपोआपच लाभत असते. त्यामुळे प्रत्येक कामाला जर ईश्वरी काम समजून केले तर एका सुदृढ समाज व्यवस्थेला निर्माण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असेच समर्पणाचे काम आपण सर्वांनी केले यासाठी आपणा सर्वांचे मी कौतुक करतो. आपल्या सर्वांच्या समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

या कार्यक्रमात केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुनील खापर्डे, पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे प्रोफेसर संजय झोडपे, पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड हुमन रिसोर्सेसचे अध्यक्ष डॉ. विरल कामदार, मेडिकल कॉलेज नागपूरचे डॉ. सुशांत मेश्राम, मेयोचे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. आशिष सातव, कविता सातव, नागपूर मेडिकल कॉलेजचे  वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, नागपूर शहर वैद्यकीय शाखेचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, नागपूर जिल्हा वैद्यकीय शाखेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती मानमोडे, होमिओपॅथिक असोसिएशनचे  उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश ढाकुलकर, लोक समस्या संशोधन व  कल्याण समितीचे डॉ. दिलीप गुप्ता, श्री उराडे, मैत्री परिवार संस्था नागपुरचे समन्वयक चंद्रकांत पेंडके, लोक जागृती मोर्चाचे ॲडव्होकेट रमण सेनाड, सेवांकुर  समाजसेवी संस्थेचे डॉ. सुधीर टोमे, मिशन विश्वास अभियानचे पुष्कर भाई, राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेचे सचिव वामन तेलंग, मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन सामाजिक संस्थेचे डॉ.अभिजीत राऊत, राजस्थान महिला मंडळाच्या श्रीमती पद्मश्री सारडा, श्रीमती सीमा मेटांगळे, द कॉमन-वेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअॅबिलिटीचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे आदींचा सत्कार झाला. यावेळी श्री. महात्मे यांनी देखील संबोधित केले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रीती मानमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश चरडे यांनी केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.