नागपूर हादरले ! भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील चौघींवर लैंगिक अत्याचार

नागपूर : भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं एका भोंदूबाबने एकाच कुटुंबातील चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहेे.या घटनेनं राज्याची उपराजधानीचं शहर नागपूर हादरलं आहे. शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू होईल, अशी भीती दाखवत नराधम भोंदूबाबनं 17 वर्षीय मुलीवर दोन महिने लैंगिक अत्याचार केला. संतापजनक घटना नागपुरात पारडी परिसरात घडली आहे. पारडी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे.

धमेंद्र निनावे उर्फ दुलेवाले असे नराधमाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे नराधमानं पीडित मुलीच्या कुटुंबातील तीन महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र आहे. दोन वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या तो संपर्कात होता.काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाब पीडित तरुणीच्या घरी आला आणि ‘तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी भीती त्यानं दाखवली होती. त्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागेल, असं सांगत मुलीवर भूताचा अधिक प्रभाव असल्याचं तो म्हणाला. त्यानंतर या भोंदूबाबानं भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो पीडित मुलीला घरी घेवून गेला आणि दोन महिने तिच्यावर अत्याचार केला.

इतकेच नव्हे तर पीडितेची आई, मामी आणि आजीवरही या भामट्यानं अत्याचार केला. पूजेच्या बहाण्याने या भोंदूबाबनं पीडित मुलीसह आई, मामी आणि आजीवरही चंद्रपूर, डोंगरगड येथे भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं कुकर्म केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे.

यापूर्वी गुप्त धन मिळवून देतो, पुत्रप्राप्ती होईल, अशी आश्वासने देत एका भोंदूबाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली होती. ही घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे घडली होती. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.