‘True caller’वर केंद्रीय अधिकाऱ्यांचे नाव ठेवून पुण्यात उच्च अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न
पुणे : केंद्रीय नागरी विकास मंत्रालयातील सचिव असल्याचे सांगून मोबाईलवरील ट्रु कॉलरवर त्यांचे नाव ठेवून पीएमआरडीएचे आयुक्त आणि महा मेट्रोचे कार्यकारी संचालक यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तर महाराष्ट्र मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिहाडे यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गौतम बिहाडे हे त्यांच्या महाराष्ट्र मेट्रो कार्यालयात असताना २६ डिसेंबर रोजी त्यांना एक फोन आला. त्यावर समोरच्याने मी दुर्गा शंकर मिश्रा सचिव गृह निर्माण मंत्रालय व नागरी बोलतो आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या ट्रॅ प्लिंथ कंत्राटदार यांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांना माझ्याशी बोलायला सांगा व त्यांचा नंबर मला द्या, असे त्यांनी बिहाडे यांना सांगितले. त्यांनी हे कंत्राटदार आपल्या नाही तर रवीकुमार यांच्या अधिपत्याखाली काम करीत असल्याचे सांगितले. बिहाडे यांच्या मोबाईलवरील ट्रु कॉलरवर दुर्गा मिश्रा असे नाव दिसत होते. पण इतका मोठा अधिकारी आपल्याला कसा फोन करेल, अशी शंका आल्याने त्यांनी ही बाब व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना सांगितले. तेव्हा त्यांनी दुर्गा मिश्रा यांचा हा नेहमीचा नंबर दिसत नाही. त्यांचे व्हॉटसॲप प्रोफाईल चेक केल्यावर सेक्रेटरी दुर्गा मिश्रा व फोन नंबर कोलकत्ता असे दिसत होते. त्यानंतर त्यांना या नंबरवरुन दोन तीनदा कॉल आले. तेव्हा दीक्षित यांच्या सांगण्यावरुन त्यांनी ते व्हॉईस रेकाॅर्ड केले. त्यावर दीक्षित यांनी हा आवाज मिश्रा यांचा नसल्याचे सांगितले. मिश्रा यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कळविल्यावर त्यांनी तक्रार देण्यास सांगितले. त्यावरुन आरोपी हा मेट्रोचे कंत्राटदारांना ठकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने दुर्गा शंकर मिश्रा यांचे नावाचा वापर करुन त्यांचा फोटो व्हॉटसॲप प्रोफाईलवर ठेवून टु कॉलरवर त्यांच्या नावाची नोंद करुन ठकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
याचप्रमाणे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना वारंवार फोन करुन फसवण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुहास दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.सुहास दिवसे यांनी सांगितले की, एक जण स्वत: ला केंद्रीय सचिव मिश्रा असल्याची बतावणी करुन आपल्याला फोन करीत होता. त्या नंबरची खात्री केल्यावर तो बनावट असल्याचे लक्षात आले. महा मेट्रोच्या कंत्राटदारांकडून गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने संशयिताने वारंवार फोन केल्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!