धक्कादायक! सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबईः सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे.

राजेश टोपेंनी सांगितलं की, कोव्हिशील्ड लसीची बिल्डिंग आगीच्या स्थळापासून लांब आहे, त्यामुळे कोव्हिशिल्डच्या लसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं अजित पवार आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे

महापौर मुरलीधर मोहोळ याची प्रतिक्रिया

सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांचे ट्विट

सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहे.   तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले…

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री काय म्हणाले…

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी म्हटलंय की,पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत

लसनिर्मितीवर परिणाम होणार का?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही. आग नवीन इमारतीच्या ठिकाणी लागली आहे. त्यामुळे या आगीचा लसनिर्मितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटद्वारे सांगण्यात येत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या BCG लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तेव्हा या इमारतीचीसुद्धा पाहणी केली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.