“लॉकडाउन काळातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ”

पुणे :’लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८नुसार केलेली कारवाई मागे घेण्यासंदर्भात गृह सचिवांशी चर्चा सुरू आहे. या नागरिकांना देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणे, दुकाने खुली ठेवणे अशा पद्धतीच्या नियमभंगांबाबत पुण्यात सुमारे २८ हजार जणांविरोधात कलम १८८नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील अन्य भागांमध्ये ही संख्या लाखांच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या नागरिकांच्या घरी पोलिस येत असून, त्यांची चेहरेपट्टी नोंदवून छायाचित्रे आणि ओळखपत्रे जमा करण्यात येत आहेत. पोलिस आणि न्यायालयीन कारवाईच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख, विनोद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन ही कारवाई मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

लॉकडाउनच्या काळात अनेक नागरिक निकडीच्या कामांसाठी घराबाहेर पडले होते. त्या काळात कामाच्या ताणामुळे पोलिसांनी केवळ त्यांची नावे लिहून घेतली, आता त्यांना नोटिसा येऊ लागल्याने कायदेशीर कारवाईची भीती आणि विनाकारण त्रास दिला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन या नागरिकांना पाठविलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे. या विषयावर गृह सचिवांशी चर्चा सुरू असून सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ आणि राज्य पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.