सीरमला इन्स्टिट्यूटला आग लागल्यानंतर अदार पुनावालांचे ट्विट

पुणे  :देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली .BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग  लागली होती आणि आग विझवण्यास अग्निशामन दलाला यश आले आहे. यानंतर सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहे.   तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं आहे.

मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

मुक्ता टिळक यांना घातपाताचा संशय

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटतंय. कारण ज्या ठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे” असा संशय मुक्ता टिळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटमधील आग लागलेल्या घटनास्थळाला भेट देणार आहेत. अजित पवारांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही आगीची दखल घेण्यात आली असून गृह विभागाला आगीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कोव्हिशील्ड लस देशभरात रवाना

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोव्हिशील्ड लसीचे डोस 11 जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना झाले.

पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात पुणे विमानतळावरुन लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठवण्यात आले. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.