भीमा नदीत धडावेगळे हातपाय आणि डोकं पाहून खळबळ, अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रांनीच केला खून

इंदापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून चार मित्रांनी धारदार शस्त्रांनी एका मित्राचा खून केला. मृताचे धारदार हत्याराने हात, पाय, डोके तोडून त्याचे धड नदीपात्रात टाकण्यात आले. ही खळबळजनक घटना  गणेशवाडी-बावडा गावच्या हद्दीत भीमा नदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात घडली.

संजय महादेव गोरवे (वय २३ रा. टाकळी, टेंभुर्णी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दादा कांबळे (रा. बावडा), लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले आणि महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत. यातील विकी भोसले व महेश सोनवणे या दोघांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृत तरुणाची आई मंजूषा गोरवे (५१, रा. टाकळी, टेंभुर्णी) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, लकी, विकी व महेश एकमेकांचे मित्र असल्याने त्यांचे घरी जाणे-येणे होते.यातूनच संजयची लकी, विकी आणि महेशच्या महिला नातेवाईकांशी ओळख झाली. पुढे ही ओळख वाढली आणि त्यातूनच संबंधित महिला संजयला घरच्या कामासाठी बोलावू लागल्या. ते एकत्र फिरुही लागले. मात्र, हीच गोष्ट लकी, विकी आणि महेशला सहन झाली नाही आणि त्यांनी संजयचा काटा काढण्याचा कट रचला.

या कटानुसार आरोपी लकी, विकी आणि महेशने संजयला त्यांच्या बावडा येथील काका दादा कांबळे यांच्या घरी कार्यक्रमाचं खोटं आमंत्रण दिलं. या ठिकाणी आल्यानंतर आरोपींनी संजयला भीमा नदीच्या गारअकोले  पुलाजवळील नदीपात्राजवळ नेत धारदार हत्याराने संजय याचे दोन्ही हात, दोन्ही पाय व डोके धडावेगळे करत त्याचा निर्घृण खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेले शरीराचे अवयव इतरत्र फेकून देत नंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याची भीमानदीच्या पात्रात विल्हेवाट लावली.

संजय बावडा येथे मित्राच्या घरी जेवायला गेला तो परत न आल्याने फिर्यादी यांनी दुसर्‍या दिवशीपासुन शोधाशोध सुरू करून संजय बेपत्ता असल्याबाबतची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१९) रोजी दाखल केली होती.

बेपत्ता संजयचा सर्वत्र शोध सुरू असताना गावातील एकाचा फिर्यादी यांच्या पुतण्याला फोन आला व गारअकोले पुलाजवळ भीमा नदीपात्रात एक प्रेत तरंगत असल्याचे सांगितले. या ठिकाणी फिर्यादी यांचे पतीसह नातेवाईक व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष जात पाहणी केली असता पाण्यात हात,पाय व डोके नसलेले प्रेत आढळुन आले.  यामुळे हा हत्याचा प्रकार समोर आला. संजयची आई तो बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेतच होती. त्यातच हा अनोळखी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी संजयच्या आईला बोलावले. यावेळी संजयच्या शरीरावरील जन्मजात खुणा आणि कपडे यावरुन आईने हा संजयचाच मृतदेह असल्याचं सांगितलं.

संजयची ओळख पटल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवत अवघ्या 2 तासाता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.