रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं अशी प्रतिक्रिया  शरद पवार यांनी दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले की,धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेने आपली तक्रार मागे घेतली अशी बातमी वाचण्यात आली आहे. पण आम्ही या प्रकरणावर चर्चा केल्यावर आम्हाला वाटलं होतं, की सत्यता पडताळली पाहिजेत. सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण कारवाई करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली होती. हे प्रकरण गंभीर होते. परंतु, ज्यावेळी कागदपत्रातून आमच्यासमोर माहिती आली, त्यामुळे खोलात जाऊन चौकशी करण्याचा निष्कर्ष आम्ही काढला आणि आमचा हा निर्णय योग्य राहिला, असं शरद पवार यांनी सांगितले.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहमतीच्या संबंधाचा खुलासा केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहीण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी अस्वस्थ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.