26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार : गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे  : पुणे येरवडा कारागृहात पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. २६ जानेवारीला येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे.” असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 26 जानेवारीपासून पुण्यातील येरवडा कारागृहात जेल पर्यटन राबवण्याचा निर्णय गृहविभागाने घेतलाय. या जेल पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडवण्यात येणार आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील मोठा भाग हा येरवडा कारागृहाशी जोडला गेलाय. महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार देखील येरवडा कारागृहातच पार पडला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली. देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.

मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल अमीर कसाब यालाही येरवडा कारागृहातच फाशीवर लटकवण्यात आलं होतं. येरवडा कारागृहातील अशी ठिकाणा या कारागृह पर्यटनादरम्यान पाहता येणार आहेत. त्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून गाईड देखील पुरवण्यात येणार आहे. एकावेळी 50 व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. त्यासाठी किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकींग करावं लागणार आहे. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू , मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही. मात्र आतमध्ये गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत. या जेल पर्यटनाची सुरुवात 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या कारागृहांमध्ये शिक्षा भोगली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कोठड्यांचे जतन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी काराग-ह पर्यटन उपयुक्त ठरु शकते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी ‘ दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.