“आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल”- अजित पवार

पुणे : केंद्र सरकारने जनतेच्या मागण्या लक्षात घ्याव्यात. ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरूनही त्यांनी विरोधकांना चांगलेच झापले आहे

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण हे प्रकरण काही केल्या थांबत नाही. दरम्यान, या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. ‘आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे.

अजित पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली. लॉकडाऊन नंतरची ही पहिलीच बैठक होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना कृषी कायद्यापासून ते धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर सडेतोड उत्तर दिली. ‘आता विरोधक काय म्हणतील याचा नेम नाही. आधी भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचे समर्थन केलं होतं. नंतर त्या महिलेनं तक्रार मागे घेतल्यामुळे तोंडघशी पडले. आता थातूरमातूर उत्तर दिली जात आहे. आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

तसेच, ‘धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप व लांब जाईल. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युउत्तर दिले.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरदेखील पवारांनी भाष्य केले. जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा. लोकसभेतच ही मागणी झाली होती आणि ही खूप जुनी मागणी असल्याचे ते म्हणाले.

तसंच, त्या 3 केंद्रीय शेतकरी कायद्याला राज्यात आता स्थगिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कोणत्या कायद्याला आमचे समर्थन नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मला अनेक नेते हे भेटायला येत असतात. काही विकासकामांच्या निमित्ताने भेटत असतात. त्यामुळे या भेटींचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजांचे मत काय…

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तो विषय आता मागे पडला आहे. तरीही त्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आता आलाच आहात तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.