कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही: शरद पवार

मुंबई: केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली.

‘राज्याचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून भेटण्याचे सौजन्य राज्यपालानी दखवायला हवं होतं. ती संवेदना राज्यपालांना हवी होती. महाराष्ट्राच्या राज्यपालांना अभिनेत्री कंगना रणौतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत कधी असले राज्यपाल नव्हते,’ अशा खरमरीत शब्दांत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, राज्यपाल आणि शेतकरी शिष्टमंडळ भेट होणार नाही. कारण राज्यपाल आज गोव्यात आहेत, ते मुंबईत रात्री उशिरा येतील. शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. इथे शेतकरी फक्त निवेदन घेऊन त्यांना भेटणार होते. पण हे माहित असून देखील राज्यपाल गोव्याला निघून गेले आहेत. त्यामुळे असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना भेटायला नाही. खरं तर जेव्हा अन्नदाते मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात आले तेव्हाच राज्यपालांनी त्यांना सामोरं जायला हवं होतं. किमान शेतकरी निवदेन घेऊन राजभवनावर येत असताना त्यांनी तिथं थांबणं अपेक्षित होतं. पण तेवढं देखील सौजन्य त्यांनी दाखवलं नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी राज्यपालांविरुद्ध संताप व्यक्त केला.

‘गेले ६० दिवस शेतकरी हे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. पण सरकारकडून सांगण्यात येत आहे की, या आंदोलनात केवळ पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. पण पंजाबचे शेतकरी काय पाकिस्तानचे आहेत?’ असा सवाल पवारांनी उपस्थित केला. ही लढाई फक्त शेतकऱ्यांची नाही. ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांविषयी कवडीचीही किंमत नाही. ६० दिवसापासून शेतकरी रस्त्यावर बसले आहेत. पण पंतप्रधानांनी त्यांची साधी चौकशीही केली नाही.

मुंबई पोलीस सतर्क, अनेक ठिकाणी नाकाबंदी

मुंबईत राज्याच्या सर्व भागांमधून मोर्चात सहभागी होऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आणि उद्याच असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हे घातपाताच्या संभाव्यतेमुळे हाय अलर्टवर आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केलेली आहे. सशस्त्र पोलिसांसह रिफ्लेक्टर, एलईडी दिवे आणि आधुनिक बॅरिकेडिंग यासह घाटकोपर अंधेरी लिंक रोड, एलबीसी मार्ग आणि मुंबईच्या सर्वच सीमांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.