नकलीपणाच्या “त्या” आरोपावर रोहित पवारांनी निलेश राणेंना लगावला सणसणीत टोला, म्हणाले…

मुंबई : राजधानी दिल्ली पाठोपाठ आता राज्यातील शेतकरी देखील केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यास कमी पडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. आता त्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना नकलीपणा करत असल्याचे म्हलटे होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.

निलेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित म्हणाले की, “बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील” असं म्हणत निलेश राणेंना टोला लगावला आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे. यासंदर्भात, मी ४ डिसेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पोस्टचा आधार घेऊन काही न्यूज पोर्टलने मी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केलाय. पण हा आरोप अर्धवट माहितीवर एकांगी पद्धतीने करण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळं कृषि कायद्यांबाबत मी माझी भूमिका पुन्हा एकदा इथं स्पष्ट मांडतोय, हे टीकाकारांनी जरुर लक्षात घ्यावं” असं रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नव्या कायद्यांमुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्याला येऊ शकणाऱ्या अडचणी मी सांगितलेल्या आहेत. मग या अडचणी येणार असतील तर कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी करायला नको का? आणि शेतकरी हिताच्या तरतुदी असायला हव्यात ही मागणी करणे हा दुटप्पीपणा आहे का? असेल तर मग हो… शेतकऱ्याच्या हितासाठी रोहित पवार याबाबतीत नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि तो करतच राहीन. मी स्वतः एक उद्योजक असल्याने मी तर कृषी कायद्यांची बाजू घेतली पाहिजे, परंतु शेतकरी हा देशाचा कणा आहे, तो वाचला तर देश वाचेल हे मी जाणून आहे.”

शेतकरी हा शेतकरी असतो, त्याला ना जात, ना धर्म, ना प्रांत असतो. तो जगाचा पोशिंदा आहे. म्हणून त्याला सन्मान द्यायलाच पाहिजे. तसंच कृषी कायदे आणि त्यातल्या तरतुदी काय, शेतकऱ्यांचा विरोध कशासाठी या सर्व बाबी प्रत्येक भारतीयाने विशेषत: तरुणांनी सर्व बाजूंनी विचार करून समजून घ्यायला हव्यात. यामध्ये माध्यमांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. लोकशिक्षणाचं काम माध्यमंच करत असतात. त्यांनीही या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यापक आणि वास्तववादी वृत्तांकन करावं, ही अपेक्षा आणि माध्यमात आलेल्या बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील” असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

निलेश यांनी म्हटले होते की, ‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

 

रोहित पवारांच्या बारामती अ‌ॅग्रोच्या फ्लेसमध्ये काय म्हटलंय…?

करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे
वर्षभर हमी भावाने खरेदी
शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा
शून्य टक्के वाहतूक
विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. पारित केलेले कायदे रद्द केले जावेत, यासाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे तर इकडे मुंबईतही शेकडो किलोमीटर अंतर चालून शेतकऱ्यांचा लाल जथ्था राजभवनावर धडकणार आहे. मुंबईच्या या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे किंबहुना आज ते मोर्चाच्या ठिकाणी स्वत: उपस्थिती लावणार आहेत.

शेतकऱ्यांचा आक्रोश….

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.