बेकायदा गावठी दारूची निर्मिती करून विक्री सुरू असलेल्या अड्डयावर पोलिसांचा छापा

मावळ(नवनाथ आढाव): कडधे गावच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूची निर्मिती करून विक्री सुरू असलेला अड्डा कामशेत पोलिसांनी छापा टाकुन उध्वस्त केला आहे. हि कारवाई सोमवार (दि.२५) रोजी करण्यात आली असुन पोलिसांनी ३ लाख ३ हजार रुपयांचे रसायन नष्ट करत एकास अटक केली आहे.याप्रकरणी दारू भट्टी चालक परशुराम मोतीराम राठोड (वय ४१, रा. कडधे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कडधे गावच्या हद्दीतील पवना नदीच्या काठाशी मागील अनेक वर्षांपासून गावठी दारूची भट्टी उभारून त्यापासून गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून त्याची मावळात ठिक -ठिकाणी विक्री केली जाते. मागील महिन्यातच या दारू भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. त्या कारवाई नंतर पुन्हा त्याच ठिकाणी गावठी दारू भट्टी उभारून दारूची निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राम कानगुडे यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार समीर शेख, पोलीस नाईक राम कानगुडे व सागर बनसोडे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास कडधे गावच्या हद्दीतील पवना नदीकाठच्या दारू भट्टीवर छापा टाकत कारवाई केली. यावेळी तेथे उपलब्ध असलेल्या ३ लाख ३ हजार रुपये किमतीचे दारू बनविण्यासाठी तयार केलेले रसायन पोलिसांनी नष्ट केले. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.