कामशेत मधील गादीच्या कारखान्याला भीषण आग

मावळ(नवनाथ आढाव): कामशेत हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळील ताजे – पिंपळोली रस्त्यावर असलेल्या सालेम ट्रेंडिग या चिंधी फॅक्टरीला बुधवारी ( दि. २७ ) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक पथक आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर चार तासांनंतर आग आटोक्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असावी असे कळतं आहे.

आग लागल्याची माहिती कळताच पिंपळोली गावच्या पोलीस पाटील दिपाली बोंबले यांनी कामशेत पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार तात्काळ कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी घटनास्थळास भेट देऊन तळेगाव नगरपरिषद व लोणावळा नगरपालिकेच्या अग्निशामक पथकास पाचारण केले.तसेच वीजकर्मचाऱ्यांना बोलवून वीज पुरवठा खंडीत केला. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत चिंधी फॅक्टरी पुर्णपणे जळुन खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

अग्निशामक पथकाच्या मदतीने पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस हवालदार महेश दौंडकर, समीर शेख, वाळुंज, राम कानगुडे यांच्या पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.