धनंजय मुंडे आणि ‘ती’ महिला मध्यस्थीच्या माध्यमातून आपापसातले वाद मिटवणार, मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र सादर

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली आहे. न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्यापुढे यावर सुनावणी झाली.

डिसेंबर 2020 मध्ये धनंजय मुंडेंनी या महिलेविरोधात मानहानीचा दावा केला होता. या महिलेनं तिचे व धनंजय मुंडे यांचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर जाहीर केले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात हा दावा केला होता. यात त्यांनी या महिलेकडनं नुकसान भरपाईचीही मागणी केली होती. मात्र अंतरीम दिलासा मिळताना मुंडे यांनी नुकसान भरपाईची मागणी मागे घेत केवळ या महिलेला भविष्यात अशा प्रकारच्या पोस्ट समाज माध्यमांवर करण्यापासून रोखण्याच निर्देश देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हायकोर्टानं या महिलेला अशा प्रकारच्या पोस्ट करण्यास मनाई केली होती.

गुरूवारी हायकोर्टात या दोन्ही बाजूंनी आपापसातला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्यास तयारी असल्याचं हमीपत्र हायकोर्टात सादर केलं. या मध्यस्थाचा सारा खर्च धनंजय मुंडे करणार असल्याचंही या हमीपत्रात म्हटलेलं आहे. डिसेंबर महिन्यात हा दावा मुंडे यांनी हायकोर्टात केल्यानंतर या महिलेच्या बहिणीनं धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप लावत त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांत ही तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना लेखी कळवलं होतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.