प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवड : प्रियकराने लग्नासाठी दिलेला नकार तरुणीला सहन न झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने दोन चिठ्या लिहून ठेवल्या. त्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानंतर प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 जानेवारी रोजी राजनगर,ओटास्कीम, निगडी येथे घडली.

धनंजय बाळासाहेब राऊत (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्या 38 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 21 वर्षीय मुलगी आणि आरोपी धनंजय यांचे प्रेमसंबंध होते. धनंजय याने मुलीला लग्नाचे आश्वासन दिले मात्र तिच्यासोबत लग्न केले नाही. मुलीला शिवीगाळ करून तिला मानसिक त्रास दिला. त्यातून तरुणीला मानसिक ताण आणि नैराश्य आले. तो त्रास सहन न झाल्याने तरुणीने 23 जानेवारी रोजी दुपारी पावणे एक ते सव्वा एक वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्या चिठ्यांमध्ये धनंजय याने तिची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यावरून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.