बिल्डरकडून खंडणीसाठी ऑफिस बॉयचे अपहरण; दोघांना अटक

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणार्‍या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करुन त्याला सोडून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडण विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्याला येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते.

आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय 29 ) आणि राहूल बाळू घोरपडे (वय 22, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथील कार्यालय आहे. १८ वर्षाचा धिरज ऑफिस बॉय म्हणून काम करतो.बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथे आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने धिरज याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व येरवडा येथे जायचे असल्याचे सांगून त्याला घेऊन गेलेे. आरोपींनी फिर्यादी साईकुमार यांना फोन करून त्यांच्या कर्मचाऱ्याला सोडून देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिसांना खबर दिली.

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यावरुन वाद झाले. आरोपी एकमेकांशी भांडू लागल्याची संधी साधून तरुणाने तेथून पलायन करीत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपींच्या मागावर असलेल्या खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.