मुंबई पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी कंटेनर चालकाला लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
पुणे : मुंबई पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी कंटेनर चालकाला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
प्रणव शिवाजी भेगडे (वय 20, रा.खळवाडी, तळेगाव दाभाडे), धीरज देवराम गाते (वय 21, रा. शनिवारपेठ, तळेगाव दाभाडे), सौरभ सुधाकर उपाडे (रा. शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे), मल्लिकार्जुन लिंगराज कन्ने, (रा. ढोरवाडा, तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 जानेवारी रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास टाकवे गावाजवळील गरुड वडेवाले हॉटेलसमोर पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कंटेनर चालकास धमकावून दोन मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम जबरदस्तीने काढून वाहनचालकाला लुटण्याचा प्रकार घडला होता.
त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत व पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर.पाटील, एस.के.पठाण, एस.एम.वाणी, पी.एस.वाघमारे, एस.के.जावळे, आर.बी.पुणेकर, एस.एम.गायकवाड, ओ.ओ.नवले, एस.पी.आहिवळे यांचे पथक रात्रगस्त घालत होते.
त्यावेळी सचिन काळे यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती समजली की प्रणव भेगडे व धिरज गाते हे त्यांच्या अन्य साथीदारांच्या सोबत ब्रेझा गाडीमधून रात्रीच्या वेळी मुंबई पुणे हायवेवर जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक चालकांना लुटत आहेत. या माहितीच्या आधारे ब्रेझा गाडीचा शोध घेतला असता वडगाव चाकण फाटा येथे एक सफेद रंगाची ब्रेझा कार उभी दिसली.या कारचा संशय आल्याने कारमधील दोघांची चौकशी केली असता त्यांनी प्रणव भेगडे व धिरज गिते अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी 24 जानेवारीच्या रात्री टाकवे गावाजवळील गरुड वडेवाले हॉटेलसमोर एका कंटेनर चालकाला लुटल्याची कबुली दिली. त्या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोघांची नावे त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!