छातीला बाहेरून स्पर्श लैंगिक अत्याचार नाही ; निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली – शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसल्यास तो लैंगिक अत्याचार ठरणार नाही. अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलीय. तसंच या प्रकरणाची विस्तृत माहिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाकडे केलीय.

पॉक्सो अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाची सरन्यायाधीशांनी विस्तृत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाळ यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलं होतं.

केवळ मुलीच्या शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नाही म्हणून आरोपीची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयावर अॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हा निर्णय धोकायदायक ठरू शकतो, असं मतंही वेणुगोपाळ यांनी नोंदवलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देतानाच आरोपीची सुटका करण्याच्या निर्णयालाही स्थगिती दिलीय.

नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 39 वर्षीय व्यक्तीवर 12 वर्षीय मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आरोपीला शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण, याबाबत आरोपीच्या वकीलाने नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी निरीक्षण नोंदवले.त्यानी नोंदवलेल्या टिप्पणीनुसार शरीराला शरीराशी संपर्क किंवा स्पर्श होणार नाही. कपड्यावरुन केलेली चाचपणी लैंगिक अत्याचार म्हणता येणार नसल्याचे गनेडीवाला यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीत या आरोपीला निर्दोष ठरवण्यात आलं. ‘पोक्सो कायद्यानुसार आरोपीनं लैंगिक अत्याचाराच्या हेतूनं मुलांच्या खासगी अवयवांना थेट स्पर्श करणं आवश्यक आहे. या प्रकरणात असा कोणताही गुन्हा घडला नाही. केवळ कपड्यावरुन मुलांच्या शरीराची चाचपणी करणं ही कृती लैंगिक अत्याचार ठरु शकत नाही’, असं मत उच्च न्यायालयानं नोंदवलं होतं.

अल्पवयीन बालकाच्या स्तनांना ‘स्कीन टू स्कीन’ कॉन्टॅक्टशिवाय स्पर्श करणं पॉक्सो कायद्यान्वये लैंगिक शोषण श्रेणीत येणार नाही, असं मत नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी १९ जानेवारी रोजी आपल्या आदेशात व्यक्त केलं होतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.