शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग ; आठ जणांची सुटका 

पिंपरी चिंचवड :शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. त्यामुळे निर्माण झालेल्या धुरात दुमजली इमारतीच्या आठ जण अडकून पडले. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने या सर्वांची सुखरूप सुटका केली. ही घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे मोशी येथे घडली.

अमोल प्रभाकर करके (वय ४०), अमिता अमोल करके (वय ३६), खंडप्पा सुभाष गोवे (वय ४४), कीर्ती खंडाप्पा गोवे(वय ३६), बोंगरंगे श्रीकृष्ण (वय ३३), ज्योती गव्हाणे (वय ३६), आकांशा करके (वय ०८), अनुज करके (वय ०६, सर्व रा. “कृष्ण कुंज”, मोशी प्राधिकरण) अशी अग्निशामक दलाने सुटका केलेल्या नागरिकांची नावे आहेत.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला मोशी प्राधिकरण येथे एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती नागेश गव्हाणे यांनी दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातून आगीचे बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

कृष्णकुंज या इमारतीच्या जिन्याजवळ असलेल्या मीटर बॉक्स, इन्वर्टर आणि बोरवेल पॅनलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीचे स्वरूप मोठे नसले तरी वायरचा धूर जिन्यामार्गे इमारतीत पसरला. थंडीमुळे येथील नागरिकांनी खिडक्या बंद केल्या होत्या. त्यामुळे धुराला पसरण्यास जागा राहिली नाही. यामुळे इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील आठ लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच जिन्यात मोठ्या प्रमाणात साठलेल्या धुरामुळे खाली देखील उतरता येत नव्हते. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडी व श्वसन यंत्राचा वापर करून घरातील व्हेंटिलेशनचे मार्ग मोकळे केले आणि इमारतीमधील आठही जणांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान अग्निशामक मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातील सब ऑफिसर शांताराम काटे, लिडींग फायरमन दिलीप कांबळे, वाहन चालक शांताराम घारे, अमोल खंदारे, कर्मचारी गौतम इंगवले, बाळासाहेब वैद्य, अनिल निकम, श्रीकांत वैरागर, सरोष फुंडे, निखिल गोगावले, ट्रेनिंग ऑफिसर सौरभ गिरकर, पीएमपीएमएलचे वाहन चालक पांडुरंग सांगळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.