ससून रुग्णालयातून पलायन करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून ८ तासाच्या आत अटक

पुणे : शिर्डी येथील खून प्रकरणातील ससून रुग्णालयात उपचार आणल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून पळ काढलेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी केवळ 8 तासात शोध घेऊन अटक केली.समीर अक्रम शेख (वय 24, रा. शिर्डी) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोपरगाव येथील कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. याच कोठडी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन कर्मचारीही उपस्थित होते.

मात्र उपचार सुरू असताना काल तो ( दि. 29 जानेवारी) पहाटे ससून रुग्णालयातून पसार झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार आता त्याचा शोध घेतला जात होता. यावेळी स्वारगेट पोलिसांनी देखील आरोपींचा माग काढण्यास सांगण्यात आले होते. यादरम्यान पोलीस आमलदार सोमनाथ कांबळे व संदीप साळवे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी सहकारनगर भाग एक या परिसरात थांबला आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले.

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस हवालदार सचिन कदम, मनोज भोकरे, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शंकर गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.