पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचला
पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या विद्यार्थ्याचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी मुळ रा. मु. जानेफळ (पंडीत) ता. जाफराबाद, जि. जालना) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडीत (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा पाषाण येथील एका केमिकल लॅब्रॉटरीमध्ये रसायनशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरामध्ये राहत होता. दरम्यान, काल(शनिवार) सकाळच्या सुमारास सुस खिंडीत एक मृतदेह असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. सुदर्शनचा मृतदेह आढळून आला.
सुदर्शनच्या अंगावर कपडे नव्हते व गळ्यावर वार करून, ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. मात्र बाजूला पडलेल्या पँटचे खिसे तपासल्यावर त्यामध्ये आधारकार्ड आढळून आले. त्यानंतर त्याचा भावाचा शोध घेऊन त्याला याबाबत सांगण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या हत्येने पाषाण भागात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कुणी केली व कोणत्या उद्देशाने केली याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड अधिक तपास करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!