फ्लिपकार्ट मध्ये फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई
नवी मुंबई : फ्लिपकार्टमध्ये टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने बनावट ग्राहकांचा पत्ता देऊन आणि ग्राहकांच्या पत्त्यावर बनावट वस्तू ऑर्डर करुन फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कौपरखैराणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
वाजिद शकील मोमीन( वय 24) असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे. वाजिद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 11 ब्रँडेड मोबाईल आढळून आले. शकील मोमीन हा त्याचे साथीदार संघपाल मोरे आणि जयंत उगले यांच्या साथीने संबधित गुन्हे करीत होता. या तिघांनाही कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 24 हजारांचा माल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाजीद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करायचा.तो कंपनीतून बनावट ग्राहकांच्या पत्त्यावर पार्सल मागवायचा. मात्र डिलेव्हरी बॉयला ग्राहकाचा पत्ता सापडायचा नाही.ग्राहकांचा पत्ता न मिळाल्याने डिलिव्हरी बॉयकडून ते सामान परत येत होतं. हे परत आलेलं सामान फसवणूक करणारा व्यक्ती आपल्या घरी घेऊन जात होते. त्यानंतर ते सामान बाहेर काढून, त्या पॅकिंगमध्ये त्या सामानाऐवजी साबण किंवा इतर काही सामान ठेवून, पुन्हा पॅकिंग करून ते कंपनीत जमा करत होते.
काही दिवसांनी कंपनीकडून ग्राहकांपर्यंत त्यांचं मूळ सामान न पोहचल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. मूळ सामान न येता त्याऐवजी साबण, दगड पार्सल येत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या. अनेक तक्रारींनंतर कंपनीने याप्रकरणाची माहिती पोलिसांत दिली.
त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. या चौकशीत ही संपूर्ण एक टोळीच असल्याचं समोर आलं. या टोळीचा मुख्य सुत्रधार फ्लिपकार्ट कंपनीतच काम करणारा टीम लीडर वाजिद शकील मोमिन असल्याचं उघड झालं.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!