मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्वीकारली

मुंबई : रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ (Jaish-ul-Hind) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम अॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांच्या मागणीविषयीही उल्लेख आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी एखादी दहशतवादी संघटना जबाबदारी घेते ते प्रसिद्ध होण्यासाठी करत आहे. दिल्लीतील दूतावासाबाहेर स्फोट प्रकरणातही असा दावा केला गेला होता. परंतु आतापर्यंत तपासात कोणताही पुरावा सापडला नाही. मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील चौकशीतही कोणताच पुरवा सापडलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे मेसेज?

ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तरी सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली, पण काही झालं नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे. तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा, असा मेसेज टेलिग्राम अॅपवर लिहिण्यात आला आहे

आरोपी मुंबईबाहेर पळाले?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास मुंबई पोलीस घेत आहेत. मात्र पोलीस तपासात अद्याप कोणताही असा पुरावा सापडला नाही की तपास पुढे सरकू शकेल. पोलिसांना या कटात वापरल्या गेलेल्या इनोव्हा कारचे फुटेज सापडले असून आरोपी टोल नाक्यांवरून मुंबईबाहेर गेले असल्याचं यातून दिसत आहे.

शुक्रवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या काड्यांनी सुसज्ज स्कॉर्पिओ कार सापडली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर ही कार पार्क केली होती.

अंबानी कुटुंबाला पत्राद्वारे धमकी

मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आढळून आल्यानं खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिलं की, “नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.” घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.