मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.  महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. ‘सरकारने मोठा निर्णय घेतला असून हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत, तर परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसंच रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे,’ असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

पोलीस दलाबाबत सरकारचा मोठा निर्णय

हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
– रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
– संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
– परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी

 

ज्यावेळेस स्फोटकांनी भरलेली हिरव्या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यावेळेस त्यांनी तपासात बरीच गडबड केल्याचा संशय एनआयएला आहे. या सर्व गोष्टी सचिन वाझे यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांपासून लपवून ठेवल्या होत्या.

5 मार्चला मनसुख मिश्रीलाल हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्यानंतर हिरेन परिवाराकडून थेट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांना वरिष्ठांनी बोलावून या आरोपांबाबत विचारणा केली असता त्याही वेळी सचिन वाजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. सोबतच पुन्हा एकदा आपण मनसुख मिश्रीलाल हिरेन याला ओळखत नसल्याचं सांगितलं.

या गोष्टीवरून एक मुद्दा स्पष्ट होतो तो म्हणजे हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथे पार्क करण्यात आली आणि या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडल्या, जे काही लपवलं, याबाबत अतिशय कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. आता या सचिन वाझे यांच्या प्रकरणाची मूळे नेमकी कुठपर्यंत आहेत, हे आगामी काळातच स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी याप्रकरणात इतरही काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह

दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात  परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं बोललं जातं

कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केलं आहे.1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडे सध्या महासंचालकपदाची (कायदे व तांत्रिक विभाग) जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

 

नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते.

 

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.

 

2016 मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता.

 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना 2018 साली नगराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता. त्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. विधान परिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा नियम आहे. हा नियम मोडल्याबद्दल नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.