अंबरनाथ वडोली गावातील एमआयडीसीत 2 मोठ्या केमिकल टाक्यांचा स्फोट

अंबरनाथ (गौतम वाघ) : अंबरनाथ वडोलगाव एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीत दोन मोठ्या रासायनिक टाक्यांचा स्फोट झाल्याने संपूर्ण केमिकल कंपनी आणि परिसरात वाहून गेले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील कंपनी प्रशासनाने त्याची माहिती अग्निशामक दलाला दिली नाही.

वडोलगाव एमआयडीसी मधील पॅरामाउंट मिनरल्स अँड केमिकल्स कंपनीमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक मोठा स्फोट होऊन त्यात कंपनीतील रासायनिक द्रव्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेले एक लाख लिटर क्षमतेची टाकी फुडून सर्व केमिकल हे कंपनी परिसरात वाहून गेले. या टाकीतील सर्व द्रव्य कंपनीच्या आवारात पसरल्याने एकच हाहाकार माजला होता. याच टाकीच्या बाजूला लहान टाकी देखील होती. त्यावर देखील रासायनिक द्रव्यांचा लोड आल्याने ती टाकी देखील फुटून मोठा अपघात घडला.सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या कंपनीच्या शेजारीच लागून अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार लाईन टाकण्याचे काम सुरू होते. संपूर्ण यंत्रसामुग्री काम करण्यासाठी आलेली असतानाच या टाकीचा स्पोर्ट झाल्याने सर्व केमिकलयुक्त द्रव्य पालिकेच्या यंत्रसामग्रीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणताही कर्मचारी काम करीत नसल्याने त्यांना इजा झाली नाही. सर्व प्रकार सकाळी घडलेला असताना देखील त्याची साधी कल्पना देखील अग्निशामक विभागाला देण्यात आली नाही.

एवढेच नव्हे तर अंबरनाथ पोलीस ठाणे देखील या अपघाताबाबत अनभिज्ञ होते.हा सर्व प्रकार पालिकेच्या ठेकेदाराने पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर घटनास्थळी तब्बल तीन तासानंतर अग्निशामक दलाची यंत्रणा पोहोचली त्यासोबत पोलीस देखील घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती लपविणाऱ्या कंपनी व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली. या कंपनीला तीन महिने आधी रासायनिक प्रदूषणाच्या नावाखाली बंद करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वी ही कंपनी नव्याने सुरू करण्यात आली होती. त्यातच हा अपघात घडल्याने कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हे केमिकल वालधुनी नदीत वाहून गेल्याने वालधुनी बचाव समितीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले,या प्रकरणी वालधुनी बचाव समितीचे शशिकांत दायमा यांनी माहिती दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.