बँकेतून रुपये लाटण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद,पुणे सायबर पोलिसांमुळे बचावले सव्वा दोनशे कोटी !

पुणे : पुणे शहरातील खाजगी बँकांच्या निष्क्रिय खात्याचा डेटा चोरून त्याआधारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांचा अपहार करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्विकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकीी चक्क 4 आयटी इंजिनिअरसह महिला देखील आहेत. या कारवाईने बँकिंग क्षेत्रात देखील खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक खाते धारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई) मूकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, औरंगाबाद), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) व अनघा अनील मोडक (वय 40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंटची (निष्क्रिय खाते) माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. संबंधीत माहितीचा वापर करून नागरीकांच्या बॅंक खात्यांमध्ये असणारी रक्कम आरोपी इतर खात्यांमध्ये वळवून फसवणूक करणार होते. आरोपींकडे असलेल्या बॅंक खातेदारांच्या खात्यांमध्ये तब्बल 216 कोटी 29 लाख रुपये इतकी रक्कम होती.

चोरलेली हीच गोपनीय माहिती आरोपी एका व्यक्तीला विक्री करणार होते. मात्र, या प्रकरणाची कुणकुण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला आठ दिवसांपुर्वी मिळाली. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी संबंधीत आरोपी सिंहगड रोड परिसरामध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी साध्या वेशात, तसेच वेगवेगळी वेशभुषा करून आरोपी थांबलेल्या परिसरात सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून पोलिसांनी 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कार व एक मोपेड असा तबल 43 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाघचौवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.