पुण्यात १३ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
पुणे :आई-वडीलांचा आधार नसल्याने आजीकडे राहणाऱ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.सांभाळण्याच्या आणि लग्न लावून देण्याच्या अमिषाने मुलीसोबत तो हे कृत्य करत होता
आनंद हरी पवार (वय 45) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्च ते डिसेंबर 2016 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडीत मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. पीडितेला झालेले आपत्य आरोपीपासूनच झाल्याचा डीएनए अहवाल सादर करून सरकारी पक्षाने सिध्द केले.
पीडित मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तर तिचे वडील मनोरुग्ण असल्याने ते घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे ८० वर्षाची आजी तिचा सांभाळ करीत आहे. आरोपी हा आजीच्या घरी गेल्या १० वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होता. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्ना सांवत यांनी केला. त्यांना पोलिस कर्मचारी गंगाधर नाईकरे आणि पोलिस हवालदार सुषमा पाटील यांनी मदत केली.
आरोपी हा ड्रायव्हर आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्य हे गावीच राहात होते. कामावरून आल्यावर तो अंथरूण घेण्याच्या बहाण्याने घरात येऊन मुलीला टेरेसवर घेऊन जात असे. ‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, तुझं लग्न लावून देतो’ असे सांगून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता.त्रास होऊ लागल्याने मुलीची तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तुझा गर्भपात करू, असे आरोपीने मुलीला सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी पोटामध्ये जास्त दुखू लागल्याने पीडित मुलीने आरोपीला फोन केला. माझे नाव न घेता कोणाचे तरी नाव घेऊन आजीला घेऊन दवाखान्यात जा, असे त्याने सांगितले. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आजीला सांगितला. आजीने मुलीला दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी मुलीने एका मुलाला जन्म दिला होता. ते बाळ एका संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले आहे. आरोपी हा पीडित मुलीशी विवाह करण्यासाठी तयार होता. मात्र दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पीडित मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!