सातारा जिल्ह्यात वाळू लिलावावरून दोघांचा खून
सातारा : वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटांत सकाळी साडेदहा वाजता नरवणे (ता. माण) येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. या खुनामुळे माण तालुका हादरला असून, नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे.
चंद्रकांत नाथाजी जाधव (वय 45) व विलास धोंडिबा जाधव (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ साताऱ्यात हलविण्यात आले आहे.
याबाबतची पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, माणच्या तहसीलदारांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव २२ फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी ३३ हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता. दरम्यान, विलास धोंडिबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की, चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत. या कारणातून बुधवारी (ता.17) सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन गटांतील वाद विकोपाला जाऊन चंद्रकांत जाधव यांच्या घरात कुऱ्हाड, लोखंडी व लाकडी दांडके व धारदार शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चंद्रकांत जाधवांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी विलास जाधव यांचा दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. घटनास्थळी घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली होती. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पसरलेला होता. स्वयंपाक घरातच रक्ताच्या थारोळ्यात चंद्रकांत जाधव यांचा मृतदेह पडला होता. घराबाहेरील दुचाकी व चारचाकी फोडण्यात आल्या आहेत. रक्ताने बरबटलेली लाकडी दांडकी, लोखंडी नळ्या व कुऱ्हाड तिथेच पडलेली होती.
दरम्यान, वाळूबाबत तलाठी यांना फोन का केला, याचा राग मनात धरून सकाळी साडेदहा वाजता मोटारसायकलवरून शेताकडे जाताना चंद्रकांत नाथाजी जाधव, दीपक जाधव (रा. वडजल), तुपे (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य दोन अनोळखींनी मोटारसायकलवरून येऊन मला दमदाटी करत गाडीला लाथ मारून मला खाली पाडले, तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करून निघून गेले. याबाबत मी तातडीने फोनवरून ही घटना सांगितल्यावर शिवाजी धोंडीबा जाधव, विलास धोंडीबा जाधव, संभाजी शिवाजी जाधव, विश्वास विलास जाधव, समाधान कृष्णा जाधव यांनी चंद्रकांत नाथाजी जाधव यास त्याच्या घरी जाऊन का मारले, याबाबत विचारणा केली असता पाऊणे अकरा वाजता त्याच्या घरातच व घराबाहेर आम्हा सर्वांना चंद्रकांत नाथाजी जाधव, दीपक जाधव, तुपे व दोन अनोळखींनी शशिकांत नाथाजी जाधव, सूर्यकांत नाथाजी जाधव यांच्यासह सात जणांनी कुऱ्हाड, चाकू, दगड व लाथाबुक्क्यांनी जखमी केले. या मारहाणीत भाऊ विलास धोंडीबा जाधव (वय 55) यांचा खून केल्याची फिर्याद सत्यवान धोंडीबा जाधव यांनी दिली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!