”दोषी अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या,त्या माफ करण्यासारख्या नाही” – अनिल देशमुख

मुंबई :  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी  काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्या माफ करण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे या पोलीस दलात या बदल्या करण्यात आल्या असल्याची कबुली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या बदल्या या प्रशासकीय नसून अधिकाऱ्यांच्या झालेल्या चुकांमुळे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सरकारच्या दणक्याने पोलीस दल हादरलं असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वावर आज महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्याआधी मी राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे

सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच हे प्रकरण गांभीर्याने घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात पोलीस दलात खूप मोठे बदल करण्यात आले. परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी या घडामोडी घडल्यानंतर आज अनिल देशमुख यांनी यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपास करताना आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या, असे मान्य करतच गृहमंत्री देशमुख या साऱ्या घटनाक्रमावर बोलले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून एका गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास एटीएस करत आहे. या चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. यात कोणत्याही दर्जाचा अधिकारी दोषी आढळला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

“विरोधी पक्षनेते हे सगळीकडून माहिती घेत असतात. गटबाजी ही प्रत्येक ठिकाणी असते. पोलीस आयुक्तालयातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली. चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच चौकशीत बाधा येऊ नये यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला”, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा १२,५०० पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात ५३०० पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरु झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असतानाही १२,५०० पोलिसांना सेवेत घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची वेळ ओढावलेल्या ठाकरे सरकारसमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. या बदल्यामुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आहेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) माजी प्रमुख संजय पांडे यांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते आज होमगार्डच्या मुख्यालयात जाणार नाहीत. ते मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.