यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक; शासन प्रशासनास सहयोग देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नाशिक : गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोनाविषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले.

गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण

शासनाच्या वतीने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला पुढे घेऊन जाण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरिक प्रतिसाद देतील असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्रीसोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्णवाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांचेकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.

कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्ट ट्रॅक ट्रीट या त्रिसूत्रीवर भर :  जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा मिळून करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले. तसेच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबीमधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक मनपा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजना जसे वैद्यकीय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.