इंद्रायणी नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी गुन्हे शाखेचा छापा,1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड : इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी फोफावली असतानाही तेथे वाळूचा अवैध उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कारवाई करत 14 जणांना ताब्यात घेऊन सुमारे 1 कोटी 31 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार असलेला एक आरोपी एक राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

केतन रामदास कोलते (वय २७, रा. बेकोरी, हवेली), योगेश सुरेश वाळुंज (वय २९, रा. लोणीकंद, ता. हवेली), संदेश नंदकुमार कारले (वय २५, रा. देवाची आळंदी, ता. खेड), दीपक भाऊसो येळे (वय २८),  अतुल बाबाजी येळे (वय २५, दोघे रा. पारोडी, शिरुर), अजहर मजहर शेख (वय २९, रा. लातूर), अंकुश अजयराम कुमार (वय १९, रा. तिवरा, बिहार), अर्जुन जीवन चव्हाण (वय १९, रा. कारोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ), सोहेल मौला पठाण (वय २८, रा. च-होली खुर्द, ता. हवेली), सुधीर बाळू राठेाड (वय २५, रा. कारोळा, ता. पुसद, जि. यवतमाळ), विलास सुद्राम येळे (वय ३०, रा. पारोडी, ता. शिरुर), सारीक अजिज पठाण (वय ३१, रा. च-होली बुद्रूक), रवीकुमार श्रीराम धारीराम (वय २१, रा. खुटेरीया, ता. कुसाहा, जि. गडवा, झारखंड), सचिन बापू वाळके (वय २४, रा. पेरणे, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सतीश लांडगे (रा. भोसरी) आणि अजय (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणत अटक केलेला आरोपी केतन कोलते, तसेच पाहिजे असलेला आरोपी सतीश लांडगे आणि अजय हे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीपात्रालगत च-होली गावाच्या हद्दीत रात्री वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने १९ मार्चला रात्री नदीपात्राच्या अलीकडे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहने पार्क करून पायी गेले. नदीपात्रालगत पथक दबा धरून बसले. त्यावेळी चार ट्रॅक्टर, दोन पोकलेन मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा सुरू होता. नदीपात्रात जलपर्णी असलेल्या ठिकाणी पाण्यात उतरून वाळू चाळणीने चाळून ते ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये 2 पोकलेन, 4 ट्रॅक्तर, ट्रॉली, 14 ब्रास वाळू, 1 दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जाणार आहे. यामध्ये कोणतेही आरोपी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात वाळू माफियांवर कारवाईची पहिलीच वेळ आहे. या कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. तसेच अश्या प्रकारे अवैध धंदे सुरु असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, त्यावर नक्की कारवाई होईल असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.