‘अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नचं उद्भवत नाही’ – जयंत पाटील

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलंच गाजत आहे. या मृत्यूप्रकरणात अनेक धक्कादायक आणि गंभीर खुलासे समोर आले आहेत. आता यामध्ये मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह  यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढळवून निघालं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर काल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी दिली होती. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला

 

राज्यातील मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांनी पुढं म्हटलं की, ‘याप्रकरणात एटीएस, एनआयए यांसारख्या तपास यंत्रणा काम करत आहेत. शिवाय एटीएसनं दोन संशयित आरोपींनाही अटक केली आहे. त्यामुळे तपास पुर्ण झाल्यानंतर लवकर सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच जयंत पाटलांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. त्यांनी म्हटलं की, ‘मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यातल्या किती मंत्र्यांनी राजीनामे दिले? मी त्याच्या तपशीलात जात नाही. पण या प्रकरणात लक्ष विचलित न करता दोषींवर कारवाई व्हायला हवी.’ असंही त्यांनी म्हटलं.

गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? : देवेंद्र फडणवीस 

 

काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहेत, तोपर्यंत होऊच शकत नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यानंतरच चौकशी केली पाहिजे. खरंतर आता गृहखातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चालवतात की, शिवसेना नेते अनिल परब चालवतात? कारण ज्याप्रकारे सभागृहात गृहविभागाच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अनिल देशमुखांऐवजी शिवसेना नेते अनिल परब बोलत होते. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नेमकी भूमिका कोणाची हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

 

शरद पवार काय म्हणाले…
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल स्पष्ट केलं होतं. या प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल असंही सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि  गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले. परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर त्यानी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, आयुक्त पदावर असताना नाही असं शरद पवारांनी सांगितलं. परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती असं पवारांनी सुरुवातील स्पष्ट केलं. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी 100 कोटी वसूलीचे आरोप हे गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही असंही ते म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहेत, त्यांनी योग्य ती चौकशी करावी असं पवारांनी सांगितलं होतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.