‘त्या’ पत्रकार परिषदेवर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण!

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आज सकाळपासून राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे. सकाळी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते”, असं म्हणत पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला.

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.