कर्करोग प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोडमॅप तयार करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक असा रोडमॅप टाटा रुग्णालयाने तयार करावा. औरंगाबाद येथील कर्करुग्णालयावरील अतिरीक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) तयार करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती केरेकट्टा, आयुक्त डॉ.रामास्वामी, संचालक डॉ.साधना तायडे, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे, डॉ.बाणावली, डॉ.कैलास शर्मा, डॉ.पंकज चर्तुर्वेदी, डॉ.पिंपळे आदी उपस्थित होते.

मुख, गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी, निदान आणि उपचाराची व्यवस्था या क्षेत्रीय केंद्रामध्ये करता येऊ शकते असे टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले. औरंगाबाद येथे टाटा रुग्णालयाचे मोठे उपचार केंद्र (हब) असून तेथे उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. त्यासाठी प्रतिक्षा कालावधी मोठा असल्याने या हबवरील ताण कमी करण्यासाठी नजिक असलेल्या जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रिय केंद्र (स्पोक) सुरू करण्याचा प्रस्ताव टाटा रुग्णालयामार्फत देण्यात आला आहे. त्याविषयी आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना येथे क्षेत्रिय केंद्र सुरू करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येईल.

कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले. टाटा रुग्णालयाच्या संकल्पनेनुसार श्रेणी दोन अथवा तीन दर्जाचे क्षेत्रिय केंद्र जालना येथे तयार करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या क्षेत्रिय केंद्रामध्ये तपासणी, निदान, रेडीएशन, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असेल, असेही  आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

आरोग्य विभागामार्फत कर्करोग निदान आणि उपचारासाठी  प्रयत्न केले जात असतानाच या आजाराच्या प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोडमॅप करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच त्याच्या उत्पादन आणि विक्रीवर अधिक कडक निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे तज्‍ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. त्याविषयी समाजात जाणीवजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगाबाबत प्रत्येक जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्याचे आवाहनही श्री.टोपे यांनी यावेळी केले.

यावेळी बार्शी येथील कर्करोग रुग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली. बार्शी येथील कर्करोग रुग्णालय नर्गिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असून हे रुग्णालय टाटा रुग्णालयामार्फत चालविण्याचा प्रस्ताव आहे तथापि राज्य शासनाने हे रुग्णालय चालवावे त्याला टाटा रुग्णालय तांत्रिक सहाय्य करेल अशी चर्चा यावेळी झाली. त्यावर आरोग्य आयुक्तांनी या रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.