लग्नाचा तगादा लावल्याने प्रेमीकेचा खून, दहा वर्षे फरार आरोपी गजाआड

पिंपरी चिंचवड : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे त्याने २०११ मध्ये तरुणीचा खून केला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. याप्रकरणात वाकड पोलिसांनी तपास करीत आरोपी तरुणाला अटक केली. वाकड पोलीसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तपास पथकाला ५० हजाराचे बक्षिस जाहिर केले आहे.

चांदणी सत्यवान लांडगे (वय २२), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची आई सविता सत्‍यवान लांडगे (वय ५२, रा. बलदेव नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा. डोणे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी चांदणी ही हिंजवडी येथील कंपनीत कामाला होती. त्यावेळी आरोपी घारे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी ११ सप्टेंबर २०११ रोजी फिर्यादी यांच्या घरी आला आणि चांदणीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर चांदणी घरी परतली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याबाबत २७ जुलै २०१३ रोजी पिंपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चांदणी घरातून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे पाच ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले व पायात चांदीच्या दोन पट्ट्या होत्या.

तर 2014 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक युवक राहत्या घरातुन निघुन गेला असल्याची मिसिंग तक्रार दाखल झाली होती.
या दोन्ही मिसिंग तक्रारीचा तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील हे करीत होते. या तक्रारीबाबत माहिती काढत असताना गोपणीय माहितीदाराकडुन माहिती मिळाली की, वडगाव मावळ भागातुन मिसिंग झालेला युवक किशोर घारे हा मारुंजी गावात भाजीविक्री चा व्यवसाय करीत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचुन आरोपी किशोर घारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्याची प्रेमिका चांदणी लांडगे हिच्या विषयी चौकशी केली असता सुरवातीला तो उडलाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. पोलीसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने आपल्या प्रेमिकेचा दहा वर्षापूर्वा खुन केला असल्याची माहिती दिली. दोघांच्या प्रेमसंबंधातुन झालेली गर्भधारणा आणि प्रेमिका चांदणी हिने लग्नासाठी लावलेला तगादा या कारणावरुन तिचा खुन केला असल्याचे आरोपी किशोर घारे याने कबुल केले आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी आरोपी घारे हा मारुंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चांदणीचा २०११ मध्ये खून केला असल्याचे कबूल केले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा वर्षे झोप नाही…आरोपी घारे याने गळा आवळला त्यानंतर चाकूने गळा कापून तिचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले होते. तसेच घरच्यांशी भांडण करून घरातून निघून गेला. त्यामुळे तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. दरम्यान आरोपी घारे हा महामार्ग व टोलनाक्यावर चहा विक्री करीत होता. मात्र या १० वर्षांच्या काळात तो रात्री झोपू शकला नाही. आज रात्री मी पूर्ण झोप घेऊ शकतो, असे म्हणून आरोपी घारे याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक एस.एम.पाटील, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, पोलीस हवालदार बापुसाहेब धुमाळ, दिपक भोसले, पोलीस नाईक विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, आतिश जाधव, पोलीस शिपाई नितिन गेंगजे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.