खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचे फटाके वाजवून स्वागत, ५ जणांना अटक

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले चौघे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे शिवणेमध्ये फटाके वाजवून स्वागत करण्याबरोबर लोकांना दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. शिवणेमधील राहुलनगर येथील बसथांब्यासमोर मंगळवारी दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

सागर राजेंद्र गौड (वय 19), आकाश सिब्बन गौड (वय 19), सागर भालेराव वारकरी (वय 21), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय 20) आणि सुरेंद्र राजेंद्र गौड (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय अभिषेक गुप्ता व त्याच्या सहा ते सात साथीदारांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष नागरे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम नगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. येरवडा कारागृहात ते होते. कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी ते तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर वारकरी व इतर आरोपींच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार राहुल नगर येथील बस थांब्यावर एकत्र जमले होते. हे चौघेही त्या ठिकाणी आल्यानंतर जोरजोरात ओरडत घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. तर यावेळी येथे जमा झालेल्या नागरिकांना आरोपींनी शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना पकडले. तर इतर पसार होण्यात यशस्वी झाले.अधिक तपास उत्तमनगर पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.