महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, असे मत व्यक्त करत ‘माविम ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’साठी मिळालेल्या स्कॉच पुरस्काराबद्दल महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’चे अभिनंदन केले.

राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानद्वारे ‘माविम’साठी निर्मित ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ ला नुकताच जानेवारीमध्ये ‘स्कॉच अवॉर्ड- सिल्व्हर’ हा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला होता. या पुरस्काराचे प्रमाणपत्र राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानाचे संचालक संजीव जाधव यांनी महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर केले. त्याचबरोबर ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही ॲड.ठाकूर यांना सादर करण्यात आला.

‘स्कॉच’पुरस्कार स्वतंत्र आणि त्रयस्थ संस्थेमार्फत देण्यात येणारे देशपातळीवरील मानाचे पुरस्कार म्हणून गणले जातात. यावर्षी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये उत्कृष्टता (एक्सेलन्स इन टेक्नॉलॉजी) या गटात ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानाद्वारे महिला आर्थिक विकास महामंडळासाठी या ई- बिझनेस प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. कोविड परिस्थितीमुळे स्कॉच पुरस्कार वितरण सोहळा पार न पडता थेट पोस्टाने हे पुरस्कार  पाठवण्यात आले. हा पुरस्कार नुकताच प्राप्त झाल्यानंतर मंत्री ॲड. ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर करण्यात आला.

श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय अभ्यासगटाने ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची (आयसीडीएस) पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही मंत्री ॲड. ठाकूर यांना सादर केला. नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिक सक्षम करण्यासह नागरी आणि ग्रामीण आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी सेवांची रचना पद्धती आणि कार्यपद्धती यामध्ये अधिक सुस्पष्टता येण्यासह नागरी भागातील पोषण विषयक कामात सुसूत्रता येण्यासाठी या अहवालामध्ये शिफारशी करण्यात आल्या आहेत.

स्कॉच पुरस्कारासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानामार्फत ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेले ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’चे नामांकन पाठविण्यात आले होते. त्याशिवाय पोषणाबाबत मार्गदर्शन करणारी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ ही आयव्हीआरएस प्रणाली तसेच जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ‘नो युवर डिस्ट्रिक्ट’ या उपक्रमासाठीही नामांकन पाठवण्यात आले होते. ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ आणि ‘नो युवर डिस्ट्रिक्ट’ हे उपक्रम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्याने त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार प्राप्त झाले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.